मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाईल, असे केंद्रीय हज समितीने कळविले आहे.
जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ मार्च २०२० रोजी सौदी प्रशासनाकडून हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविण्याबाबत कळविण्यात आले होते. पण त्यानंतर आता हज २०२० च्या तयारीसाठी फार कमी कालावधी राहिलेला असताना सौदी प्रशासनाकडून अद्याप पुढील सूचना प्राप्त झालेली नाही. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये ही यात्रा आहे. दरवर्षी याची तयारी फार आधीपासून सुरू केली जाते. पण यंदा आता तयारीसाठी अत्यल्प वेळ राहिलेला असताना अद्यापही सौदी प्रशासनाकडून पुढील सूचना मिळालेली नाही. तथापी, यात्रेसाठी निवड झालेले उमेदवार हज समितीकडे यंदा यात्रा होणार की नाही याबाबत सातत्याने विचारणा करीत आहेत. निवड झालेले जे उमेदवार आपली हज यात्रा रद्द करू इच्छितात, त्यांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर दिलेला यात्रा रद्दीकरणाचा फॉर्म भरुन तो ceo.hajcommittee@nic.in या ई-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबूक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रा रद्द करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांनी भरलेली १०० टक्के रक्कम कोणत्याही कपातीशिवाय परत करण्यात येईल, असेही केंद्रीय हज समितीने कळविले आहे. केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद अहमद खान यांनी देशातील सर्व राज्यस्तरीय हज समित्यांना पत्राद्वारे ही बाब कळविली आहे.