मुंबई - निवडणूक कोणतीही असो प्रत्येक मत महत्वाचे असते. जास्त मते मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करतो. इतर कोणी मत दिले नाही तरी, उमेदवार आपले स्वतःचे मत स्वतःला नक्कीच देतो. मात्र, आज झालेल्या बेस्ट समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी सह्यांचा गोंधळ केल्याने त्यांना स्वत:ची मतेही मिळवता आली नाहीत. उमेदवारांना स्वत:ची मते स्वतःला देता न आल्याने ही निवडणूक ऐतिहासिक झाली.
मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक, विशेष व प्रभाग समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत सदस्यांना आपण कोणाला मतदान करत आहोत, हे जाहीर सांगावे लागते. त्यानंतर त्या सदस्यांना आपल्या नावासमोर सही करावी लागते. सही नावासमोर न करता इतर ठिकाणी केल्यास त्या सदस्यांचे मत बाद केले जाते. आज बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रवीण शिंदे, भाजपाकडून प्रकाश गंगाधरे व काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अर्ज भरला होता. रवी राजा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे प्रवीण शिंदे आणि भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांच्यात थेट लढत झाली.
या निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांनी भाजपाचे सदस्य नाना आंबोले यांच्या नावासमोर सही केली. तर, शिवसेनेचे उमेदवार प्रवीण शिंदे यांनीही इतर ठिकाणी सही केली. या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी सह्यांचा गोंधळ केल्याने त्यांना स्वत:चीच मते मिळाली नाहीत.
याबाबत बेस्ट समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता अनावधानाने चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपाचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडून चूक झाली आहे. आत्मक्लेश म्हणून आपण बेस्ट समिती सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.