मुंबई - वंचित म्हणजे गरीब नाहीत. मुलभुत सुविधा आणि हक्कापासून वंचित राहीलेला गरीब आणि श्रीमंत प्रत्येकजण आमच्या दृष्टीने वंचित आहे. मी केवळ मतं खाण्यासाठी उभा राहिलेलो नाही, मी बी टिमचा तर मुळीच सदस्य नाही. मी जिंकणार हा चमत्कार तुम्हाला २३ मे'ला कळेल, असा ठाम विश्वास डॉ. संजय भोसले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
आम्ही निव्वळ पुतळे उभारणारे राजकारणी नाहीत. इंदु मिलच्या जागेत केवळ स्मारक उभे न करता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या धर्तीवर शिक्षणाचे आधुनिक विद्यापीठ उभारण्याचे आमचे धोरण आहे, असेही ते म्हणाले. मुंबई दक्षिण- मध्य लोकसभा मतदार संघात १० वर्षे काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड अपयशी ठरले, तर शिवसेनेचे विद्यमान राहुल शेवाळे निवडून गेल्यानंतर त्यांनी ५ वर्षे ढुंकून सुध्दा पाहिले नाही. मिनी इंडिया समजला जाणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मुलभूत सुविधांचा वानवा आहे. धारावी सारख्या भागात नागरिकांना शौचालय वापरासाठी रोज पाच रुपये आणि महिनाकाठी हजार- दीड हजार खर्च लागणे ही शोकांतिका आहे, असं भोसलेंनी स्पष्ट केले.
मुलभूत सुविधांचा अभाव -
मुंबईकर असुरक्षित असल्याचे सांगत डॉ.भोसले म्हणाले, झोपडपट्टी भागात आरोग्याचे प्रश्न असल्याने अख्खी मुंबई आजारी आहे. उपनगरातील शताब्दी हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नाहीत. चिता कैम्प परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा आमचा मानस आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी बहुमजली डुप्लेक्स शौचालय उभारण्यात येतील. आरोग्य उपचारासाठी सायन हॉस्पिटलपर्यंत रिक्षाला परवानगी दिली पाहिजे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने गरीबांना शिक्षण घेणं कठीण झाले आहे. केजी ते पीजी मोफत शिक्षणासाठी आम्ही कटिबध्द आहोत.
मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याच्या आरोपांना उत्तर देताना डॉ. भोसले म्हणाले, "मी बेस्ट कामगाराचा मुलगा आहे. शिक्षण आणि कष्टातून मी संपत्ती कमावली आहे. तीच जाहीर केली आहे. इतर उमेदवारांसारखी माझ्याकडे लपवाछपवी नाही. राजकारण्यांवर आयकर खात्याची धाड पडत नाही. परंतु प्रामाणिक उद्योजकांना त्रास दिला जातो. मोदी सरकारने पाच वर्षात देशाचे वाटोळं केले, मुलभुत सुविधा नसताना बुलेट ट्रेनचा हट्ट का धरला जातो? धारावीतला चर्मोद्योग कोणत्याही सुविधांअभावी जगात प्रसिध्द आहे. धारावी टुरीझमच्या माध्यमातून जगात मार्केटींगची गरज आहे असे ते म्हणाले.
आता इथे खरी गरज आहे ती प्रत्येक एक त्या व्यक्तिची जो या प्रस्थापितांच्या सततच्या संविधान विरोधी धोरणांनी त्रस्त झाला आहे. आपला मतदारसंघ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे येथे आंबेडकरी समाज मुस्लिम समाज व इतर ही वंचित समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. आपल्याला आंबेडकरी समाजा बरोबरच इतरही समाजातील लोकांना एकत्रित करायचे आहे, हेच काम आज अँड. प्रकाश आंबेडकर संपूर्ण राज्यभर करत आहेत.
दलित आणि अल्पसंख्यांक समाज आज दहशतीच्या छायेखाली आहेत. शहरी नक्षलवादाचे भुत उभे करुन राजरोस भ्रष्टाचार सुरु आहे. समाजातील सर्व जाती- जमातींना बहुजन वंचित आघाडीने प्रतिनिधित्व दिले आहे. मी मते खाण्यासाठी उभा राहिलेलो नाही. मी बी टिमचा सदस्य तर मुळीच नाही. मी जिंकणार हे तुम्हाला २३ मेला कळेलच असे डॉ. भोसलेंनी स्पष्ट केले.
आपल्या लोकशाहीवादी देशात सध्या सुरू असलेल्या घराणेशाहीच्या आणि जाती-पातीच्या राजकारणाला कायमचा आळा घालण्याचे महत्त्वपूर्ण काम आहेत. आज वंचितांची त्यांनी अत्यंत मजबूत अशी मूठ बांधली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.