मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील ( Brihanmumbai Municipal Corporation ) सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांचे नियंत्रक व महालेखापरीक्षक कॅगच्या ( Comptroller and Auditor General of India ) माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी कॅगने दर्शवली आहे.
लवकरच कॅगचे पथक महापालिकेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या चौकशीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) आणि राज्यातील सत्ताधारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात करोनाच्या परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेने शहरात उभारलेल्या करोना केंद्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप भाजपच्या आमदारांनी वेळोवेळी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तसेच या भ्रष्टाचाराचे कागदपत्र सादर करत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर बनलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहात याची चौकशी करण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने आता कॅग च्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी सुद्धा ठरू शकते.
याची होणार चौकशी : या चौकशीमध्ये महापालिकेतील करोना केंद्र उभारण्यातील गैरव्यवहार, करोनाच्या नावाखाली वारेमाफ खरेदी, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देणे, दहिसर येथील जमीन खरेदी प्रकरण, रस्ते बांधणी, रस्त्यांची कामे, सफाई कामगारांच्या घरासाठी असलेल्या आश्रय योजना, भेंडीबाजार पुनर्विकासात रस्त्याची रुंदी कमी करून विकासकाचा झालेला फायदा, मुंबई पालिकेतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच कंपन्या सुरू करून पालिकेची कामे लाटण्याचा आरोप या सर्वांची कालबाह्य चौकशी केली जाणार आहे.
कुठले व्यवहार वादात ? राज्य सरकारने कॅगला पाठविलेल्या प्रस्तावानुसार पालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विविध १० विभागांमध्ये करण्यात आलेल्या १२ हजार २३कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने करोनाकाळात विविध बाबींवर खर्च झालेले ३५३८.७३ कोटी, दहिसर येथे अजमेरा यांच्या भूखंडाची ३३९.१४ कोटींना पालिकेने केलेली खरेदी, चार पुलांच्या बांधकामावर झालेला १४९६ कोटींचा खर्च, करोनाकाळात तीन रुग्णालयात करण्यात आलेली ९०४.८४ कोटींची खरेदी, शहरातील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीवरील २२८६.२४ कोटींचा खर्च, सहा सांडपाणी प्रकल्पावरील १०८४.६१ कोटींचा खर्च, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील १०२०.४८ कोटींचा खर्च आदींचे लेखापरीक्षण करण्याची विनंती केली कॅग ला करण्यात आली असल्याची माहिती आहे.