मुंबई - डोंगरी परिसरातील केसरबाई इमारत सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कोसळली. एकीकडे स्वत:चे जीव वाचवण्यासाठी सर्व धावाधाव करत असताना इम्रान खान हा व्यक्ती दुसऱ्यांचा जीव वाचवत होता आणि स्वतःच जखमी होऊन बसला.
दुर्घटनाग्रस्त इमारतीसमोरच इमरानचा केबल सर्व्हिसचा व्यवसाय आहे. इमारत कोसळत असताना स्वत:च्या जीवाचा विचार न करता त्याने ३ जणांना वाचवले. मात्र, अचानक इमारतीचा काही ढिगाऱ्याचा भाग त्याच्या पायावर पडला. त्यामुळे तोही जखमी झाला. सध्या त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन यांनी देखील त्याची भेट घेऊन विचारपूस केली.
या घटनेविषयी इम्रान म्हणाला, नक्की काय झाले कळतच नव्हते. इमारतीच्या आवाजाने आताही त्रास होतो. मी बाहेर येऊन पाहिले तर इमारतीचा ढिगारा पडला होता. मी काही लोकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम केले. पण, त्यात इमारतीचा एक भाग माझ्या पायावर कोसळला आणि मी जखमी झालो. मी दोन लोकांना बाहेर काढले. त्यात एक पुरुष होता आणि दुसरे एक लहान बाळ होते.