मुंबई - तौत्के, निसर्ग चक्रीवादळांनी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता वादळांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं ३ हजार कोटींची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीनं पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.
हे ही वाचा - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती
या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी 4 वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या 7 टक्के मर्यादेत व सौम्यीकरणासाठी उपलब्ध निधीच्या 3 टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली.