मुंबई- 'दी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ कॅम्प्युटिंग (सीडॅक) या संस्थेकडून देशभरात २९ आणि ३० ऑगस्टला घेण्यात येणाऱ्या सीडॅक सी-कॅट-२०२० या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी सीडॅक संस्थेकडून २५ ऑगस्टपासून cdac.in या संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी डाऊनालोड करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सीडॅक सी-कॅट-२०२० ही परीक्षा देशभरात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या संकेतस्थळावर परीक्षेसाठी खास यूजर आयडी आणि त्याचा पासवर्डही देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे.
सीडॅक सी-कॅट-२०२० या परीक्षेसाठी देशभरातून ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉल तिकिटावर परीक्षेची सर्व माहिती, त्यासाठीचे वेळापत्रक, कोणत्या वेळात ही परीक्षा सुरू केली जाईल, यासाठीची सर्व माहिती देण्यात येणार आहे. शिवाय, त्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख, त्याची सही ही परीक्षा केंद्रावर तपासली जाणार आहे. सीडॅकडून हे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती आणि त्याची बारीक-सारीक माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
तसेच, ही परीक्षा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे रँक हे ५ सप्टेंबर रोजी उपलब्ध केले जाणार आहेत. देशातील विविध संस्थांमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमांमधील संगणक विज्ञान, मोबाईल संगणन, इलेक्ट्रॉनिक इ. मधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीडॅक सी-कॅट ही प्रवेश परीक्षा महत्वाची मानली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे पुढील प्रवेश निश्चित केले जातात.
हेही वाचा- 'नेस्को'त आवाजावरून स्क्रिनिंग पद्धतीचा अभ्यास 1 सप्टेंबरपासून सुरू