मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील हेरिटेज स्थानकांच्या यादीत असलेल्या भायखळा स्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार आहे. मुंबई सौंदर्यकरण प्रकल्पांतर्गत सामाजिक संस्था आय लव्ह मुंबई व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने भायखळा स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्यकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज या प्रकल्पाच्या औपचारिक कामाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भायखळा स्थानकात उद्घाटन करण्यात आले.
125 वर्षे जुने असलेल्या या भायखळा स्थानकात लाकडी बांधकाम व कलाकुसर पाहायला मिळते. येथील काही भाग जीर्ण झाला आहे. त्यामुळे नव्याने भायखळा स्थानकातील मुख्य इमारत व दर्शनी भागाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
भायखळा स्थानकाच्या हेरिटेज बांधकामाच्या सुशोभीकरणाचे काम प्रसिद्ध वास्तूविशारद आभा लांबा करणार आहेत. यासाठी बजाज ग्रुप सीएसआर फंडातून आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर गोयल यांनी भायखळा स्थानकाची पाहणी केली.
या कार्यक्रमाला उद्योजक मीनल व नीरज बजाज, हेरिटेज आर्किटेक्ट आभा लांबा व आय लव्ह मुंबईच्या अध्यक्ष आणि प्रकल्प हाती घेतलेल्या शायना एन.सी उपस्थित होत्या.