मुंबई - घाटकोपर पश्चिम येथील उसाचा रस विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला 26 वर्षीय तरुणाने तब्बल 45 लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी चेंबूर येथे राहणाऱ्या 26 वर्षीय राहुल सरोटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी राहुल सरोटे हा घाटकोपरच्या लालबहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या एका रस विक्रेत्याकडे गेला. तुमच्या दुकानातील उसाचा रस पिल्याने एका नौदल अधिकाऱ्याची मुलगी आजारी झाली आहे. रसामुळे मुलीला विषबाधा झाली. मुलीवर वांद्रे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सांगितले. तुमच्याविरोधात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसआय) मध्ये ही तक्रार दाखल केली असल्याचे सांगत आरोपीने पैसे घेतले. जर पैसे दिले नाहीत तर परवाना रद्द होऊ शकतो. तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना देखील तुरुंगात जावे लागेल, अशा प्रकारची धमकी मिळाल्यानंतर रस विक्रेता घाबरला. विक्रेत्याने पहिल्यांदा छत्तीस हजार रुपये आरोपीला दिले.
हेही वाचा - नौदल दिनानिमित्त 'गेट वे ऑफ इंडिया' येथे चित्तथरारक कसरती
मात्र, यानंतर आरोपी राहुल सरोटेने विक्रेत्याला तुमच्या विरोधात विविध सरकारी यंत्रणांत तक्रार दाखल झाली आहे. त्याचे पैसे भरावे लागतील असा दम देत खंडणी वसूल करण्यात सुरुवात केली. ऑक्टोबर महिन्यापासून आरोपीने रस विक्रेत्याकडून सुमारे 45 लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली. यावर कंटाळलेल्या आणि घाबरलेल्या रस विक्रेत्याने कुटुंबातील व्यक्तीमार्फत पोलिसांशी संपर्क साधला.
त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने कारवाई करून राहुल सरोटे या आरोपीला अटक केली. आरोपीने विविध सरकारी मेल आयडी तयार केले होते. त्याद्वारे रस विक्रेत्याला नोटीस पाठवून त्याच्याकडून पैसे उकळत होता. या आरोपी सोबत आणखी कोणी काम करत आहे का? आत्तापर्यंत त्याने किती जणांना फसवले आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.