नवी मुंबई : नवी मुंबई व पनवेल मध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्याचा आदेश पालिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्यामुळे खारघरमधील व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी त्यांनी उत्सव चौक ते सेक्टर १२ असा लॉंग मार्च काढला.
राज्य सरकारने दिलेल्या नवीन आदेशावर व्यापारी नाराज..
राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, बार, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या निर्णयावर सर्वत्र व्यापारी, हॉटेल संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खारघर मध्ये व्यापारी वर्गाने गांधीगिरी करत केले आंदोलन..
दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशावर नाराज होत खारघरमध्ये बुधवारी पुन्हा ४०० ते ५०० व्यापारी रस्त्यावर उतरले. यावेळी सामाजिक अंतर राखत त्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. व्यापारी वर्गाने उत्सव चौक ते सेक्टर १२ असा भव्य लॉंग मार्च काढला व उत्सव चौकात प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला.