मुंबई - पूर्व दृतगती महामार्गामुळे विक्रोळीतील इमारतींच्या पुनर्विकासात अडथळा निर्माण झाला आहे. ५० पेक्षा जास्त म्हाडाच्या इमारती या महामार्गाला लागून आहेत. तांत्रिक नियमांमुळे एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देत नसल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडत आहे.
याआधी या भागातील महामार्गालगत असलेल्या ३ ते ४ इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे. मात्र बाकीच्या इमारतींचा पुनर्विकास होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूकीअगोदर प्रश्न सुटला नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा खोलीधारकांनी दिला आहे.
विक्रोळी येथील कन्नमवार नगरसह टागोर नगर ही सर्वात मोठी म्हाडा वसाहत आहे. या वसाहतीतील इमारती ३० ते ५० वर्ष जुन्या आहेत. या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर लागून टागोर नगर कन्नमवार नगर अशा ५० पेक्षा जास्त इमारती आहेत. महामार्गाच्या मध्यभागापासून १२५ अंतरावर बांधकाम करण्यास परवानगी दिली नसल्याचे एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी विभागातर्फे सांगण्यात आले आहे. अनेकदा खेपा मारून ही प्रश्न सुटत नसल्यामुळे या इमारतीतील रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत.
कन्नमवार येथे महामार्गजवळ ३० तर टागोर नगर येथे २५ पेक्षा जास्त इमारती आहेत. टागोर नगर येथे तर २ इमारतीचे पुनर्विकासाचे काम ९० % टक्के पूर्ण झाले आहे. एकाला एक न्याय आम्हाला वेगळा न्याय, यामुळे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मी कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक २ मध्ये राहतो. आमची इमारतदेखील हायवे लगत आहे. आमची इमारत जर्जर झाली आहे. पावसाळ्यात काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? गेल्या एक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत परंतु आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे पुनर्विकास रखडला आहे, असे येथील एका रहिवाशाने सांगितले.