मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. या अधिवेशनात विधान परिषद सभागृहात 83 तास 30 मिनिटे झाले. गोंधळ आणि अन्य कारणांमुळे 9 तासाचा वेळ वाया गेला. एकूण सरासरी केवळ 6 तास कामकाज झाले. तर पावसाळी अधिवेशनाला 22 जूनपासून सुरूवात होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. अधिवेशन संस्थगित करताना ते बोलत होते.
या अधिवेशनात विधान परिषदेत 2818 तारांकित प्रश्न आले होते. त्यातील 900 प्रश्न विचारण्यात आले तर अवघ्या 63 प्रश्नांना मंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली. नियम 93 च्या 37 सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 11 सूचनांवर चर्चा झाली. तर 18 सूचनांची निवेदने पटलावर ठेवण्यात आली. 88 औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले होते. 875 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 44 सूचनांवर चर्चा झाली.
हेही वाचा - अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्तांचे पोलीस आयुक्तांना पत्र
विशेष उल्लेखाच्या 174 सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या. यात नियम 97 अन्वये पाच सूचनांवर अल्पकालीन चर्चा झाल्या. मंत्र्यांनी नियम 42 अन्वये 15 निवेदने केली. नियम 260 अन्वये पाच प्रस्तावावर चर्चा झाल्या. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावर वरिष्ठ सभागृहात चर्चा झाली. 24 फेब्रुवारी पासून अर्थसंकल्पी अधिवेशन चालू झाले होते. कोरोना साथीच्या भीतीमुळे सादर अधिवेशन एक आठवडा लवकर गुंडाळण्यात आले.