मुंबई - महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आलेल्या महापुरामुळे या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईतील सर्वच गणेशोत्सव मंडळ सध्या गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र राज्यावर आलेल्या महापुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपणही हातभार लावणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व गणोशोत्सव मंडळांना पुरग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले आहे.
सध्या झालेल्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले आहे. यात लाखो लोकांचे स्थलांतर झाले असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. गणोशोत्सव मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करून योगदान द्यावे. पुरग्रस्तांप्रति आपुलकी दर्शवत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजावटीवर भरमसाठ खर्च करण्याऐवजी त्यातील बचत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊन समाजात आदर्श निर्माण करावा असेही समन्वय समितीने म्हटले.
यापूर्वीही राष्ट्रीय आपत्ती आणि संकटांमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून गणोशोत्सव मंडळांन शक्य तितके योगदान दिले आहे. त्यामुळे यावेळी राज्यावर आलेल्या महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेऊन राज्य सरकारला सहकार्य करूया अशी साद बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड नरेश दहीबावकर यांनी मंडळांना घातली आहे.