मुंबई - जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल टाकून प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्नात प्रियकर स्व:ताच जळून मरण पावला आहे. यात तरुणीवर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
विजय खांबे असे तरुणाचे नाव आहे. विजय हा गांधीनगर येथे राहणाऱ्या तरुणीवर प्रेम करत होता. दोघांचे जवळपास अडीच वर्ष प्रेमसंबंध होते. विजयच्या कुटुंबाकडून लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर तो दारू पिऊन त्रास देत असल्याने तरुणीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जोगेश्वरी ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये तीला दाखल करण्यात आले. रुग्णालयातून बरी होऊन घरी परतल्यानंतर विजय तीला भेटण्यासाठी गेला. मात्र, यावेळी त्यांच्या मनामध्ये वेगळीच योजना होती.
दोघांमधील संभाषणादरम्यान विजयने अचानक खिशातून पेट्रोलने भरलेली बाटली बाहेर काढली आणि तीला पेटवून दिले.आगीने पेट घेतल्यानंतर तीने मोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. तेव्हा प्रेयसीला ओरडताना पाहताना त्याला दया आली आणि त्याने तीला मिठी मारली. त्यामुळे तरुणीसोबत विजयही पेटला. दोघांनाही ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना जे.जे. रुग्णालयात रेफर केलं. यात प्रेयसी 80 टक्के जळाली आहे. तर प्रियकराचा सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित तरुणावर 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.