मुंबई- परळ रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेवर तिच्या प्रियकराने चाकूने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये पीडित 36 वर्षीय महिला व राजेश काळे नावाचा आरोपी हे दोघे सुद्धा जखमी झाले आहेत.
महिलेसोबत हल्लेखोर प्रियकरही जखमी
परळ रुग्णालयात कोविड विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या एका महिलेसोबत कुर्ला परिसरात राहणाऱ्या राजेश काळे (३६) या युवकाचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव या दोघांमध्ये वाद सुरू झाल्यामुळे पीडित महिलेने राजेश काळे याच्यासोबत कुठलेही संबंध ठेवण्यास नकार दिला होता. यानंतर आरोपी राजेशने पीडित महिलेला परळ रेल्वे स्थानकाजवळ गाठून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात आरोपीने पीडित महिलेवर चाकूने वार केले व तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याच्याजवळ असलेल्या चाकूमुळे त्याच्याही पायाला दुखापत झाली. या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पीडित महिला व आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.