मुंबई - कोविड-१९ च्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्यावतीने रक्तदान वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विद्यालयांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना करण्यात आले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालय, भाईंदर येथे आयोजित शिबिरामध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मुंबई शहराचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सतिश कोलते राहत असलेल्या इमारतीत त्यांनी रक्तदान शिबीर घेतले. यामध्ये २४ जणांनी आपला सहभाग नोंदविला. एम. एल. डहाणूकर विद्यालयात आजी व माजी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा येथेही शिबीर घेण्यात आले. लाला लजपतराय कॉलेज, महालक्ष्मी येथे रासेयोने आयोजित केलेल्या शिबिरात रक्तपेढीची व्हॅन प्रत्येक रक्तदात्याच्या घरी गेली आणि जाऊन रक्त गोळा करण्यात आले.