मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईमध्ये वाढत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. केईएममधील डॉक्टर, सुश्रूषा व जसलोक रुग्णालयातील नर्स त्यानंतर आता बॉम्बे रुग्णालयाच्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईत सध्या 1 हजार 399 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टर, आया, जसलोकमधील नर्स आदी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता बॉम्बे रुग्णालयाच्या डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे डॉक्टर बॉम्बे रुग्णालयाच्या रेडियोलॉजी विभागात कामाला आहेत.
दरमान, डॉक्टरलाच कोरोना झाल्याने अन्य डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवर उपचार केले आहेत. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची कोरोना टेस्ट करण्याची नातेवाईकांकडून मागणी केली जात आहे. तर कोरोनाबाधित डॉक्टरचे अलगिकरण करण्यात आले असून इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याची मागणी केली जात आहे.