मुंबई : Bomb In Taj Hotel : भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याचा 'हॉक्स कॉल'शनिवारी रात्री करण्यात आला होता. कुलाब्यातील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी लगेच आरोपीला रात्री १२ वाजताच्या सुमारास काळाचौकी परिसरातून अटक केली आहे. आरोपीचे नाव धरमपाल सिंग (वय ३६) असे असल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय हातिस्कर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
आरोपीला अवघ्या चार तासात अटक : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी धरमपाल सिंग हा मूळचा दिल्लीचा असून, तो मजुरीचे काम करतो. मुंबईत तो कशासाठी आला होता? याचा पोलीस तपास करत आहेत. शनिवारी रात्री ७.३० ते ८.३० वाजताच्या दरम्यान मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मी ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याची माहिती दिली. ताज हॉटेल कुलाबा परिसरात असल्याने अग्निशमन दलाकडून कुलाबा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भारतीय दंड संविधान कलम ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे पोलिसांनी वेगाने फिरवली. त्यानंतर आरोपीच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याला काळाचौकी परिसरातून कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चार ते पाच तासात कुलाबा पोलिसांनी आरोपी धरमपाल सिंगला अटक केली आहे.
मानसिक तणावातून 'हॉक्स कॉल' : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला धरमपाल सिंग हा आरोपी दिल्लीचा राहणारा आहे. त्याने अशा प्रकारे 'हॉक्स कॉल' करण्यामागे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. त्यावेळी पोलीस चौकशीत आरोपीने तो प्रचंड मानसिक तणावाखाली असून एक ठिकाणी केलेल्या लेबरच्या कामाचे पैसे मिळत नाहीत. या गोष्टीचा मला मानसिक त्रास होत असून, या तणावामुळे मी हा कॉल केला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, धरमपाल सिंग हा मुंबईत का आला होता? याची कुलाबा पोलीस चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडे दाखल होणाऱ्या 'हॉक्स कॉल'च्या गुन्ह्यांची दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. आज आरोपी धरमपाल सिंग याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
हेही वाचा: