मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन शिक्षणाने झाल्याचे चित्र आहे. मुंबईलगत असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण अजूनही पोहोचले नाही. एकीकडे पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य असल्याने दोन वेळच्या जेवणाची गरज भागवणे कठीण असताना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
यावर दिगंत स्वराज फाउंडेशन या संस्थेने नामी उपाय शोधला आहे. शिक्षण देण्यासाठी त्यांनी 'बोलकी शाळा' नावाचा एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. मोखाडा तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात असलेल्या दांडवळ या गावातून या बोलक्या शाळेची सुरुवात झाली. आज ही शाळा नाशकातील इगतपुरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत सुरू झाली असून आर्थिक दुर्बल, आदिवासी आणि मागास विद्यार्थ्यांना ती वरदान ठरत आहे.