मुंबई - एमआरए मार्ग पोलिसांनी एका १२ वी पास डॉक्टरला अटक केली आहे. मुंबईतील बांद्रा परिसरात गेली १५ वर्षे स्वतःचा दवाखाना उघडून रुग्णांच्या जीवाशी तो खेळत होता. मात्र, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिनच्या कार्यालयात बोगस रजिस्ट्रेशन नंबर देऊन प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रयत्नात या डॉक्टरचे बिंग फुटल्याने एमआरए पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देवदास नरसय्या लच्चा असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
आरोपी देवदास नरसय्या लच्चा हा १९८२ मध्ये १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईत त्याच्या काकांकडे राहण्यास आला होता. या दरम्यान त्याच्या काकांच्या युनानी दवाखाण्यात काही वर्षे काम केल्यावर त्याने त्याच्या एका मित्राच्या साहाय्याने बनारसमधून एका बनावट विद्यापीठाच्या नावाखाली बीएएमएसची बनावट वैद्यकीय पदवी मिळवून दिली. १९९५ सालापासून मुंबईतील बांद्रा येथील खेरवाडी परिसरात लक्ष्मी क्लिनिकच्या नावाखाली दवाखाना उघडून हा आरोपी रुग्णाच्या जीवाशी खेळत होता.
४ मे ला मुंबईतील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिन च्या कार्यालयात सदरचा हा बोगस डॉक्टर आला असता त्याने त्याचे मेडिकल सर्टिफिकेट हरवले असून २६६०५ हा रजिस्ट्रेशन नंबर असल्याचे सांगितले.
हा रजिस्टर नंबर डॉ. संजय जोशी यांच्या नावावर आगोदरच नमूद असल्याने याची तक्रार महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिनकडून पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला आहे.