मुंबई Body Bag Scam Case : कोविड-19 काळात बाधित रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी 'बॉडी बॅग' खरेदीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली. या कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. ईडीनं मनी लॉन्ड्री कायद्यांतर्गत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर यांना चार आठवडे अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागानं याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन घेतली होती. (Covid Center Scam Case ) या प्रकरणात न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. मात्र, आता या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांची एन्ट्री झाल्यानं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
ED लवकरच चौकशीसाठी बोलावणार : या बाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ज्या नोंदीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं देखील गुन्हा दाखल केला आहे. ईडीनं दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालात प्रकल्प विभागाचे माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, माजी उपयुक्त यांच्यासह इतरही नावे आहेत. सदर कथित घोटाळ्याची एकूण रक्कम ही 49.63 लाख रुपये इतकी असल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे. या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर व इतर अधिकाऱ्यांना ED लवकरच चौकशीसाठी बोलावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुन्हा केला दाखल : सदर प्रकरणात याआधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांच्या तक्रारीच्या आधारे पेडणेकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कलम ४२० फसवणूक आणि १२० B (गुन्हेगारी कट) नोंदवली आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पुढं काय होणार?: महामारीच्या काळात बीएमसीनं आरोग्य सुविधांच्या व्यवस्थापनात निधीचा गैरवापर, अनियमितता आणि बाधित मृतदेह ठेवण्यासाठी बॉडी बॅग, मास्क आणि इतर वस्तू फुगीर दरानं खरेदी केल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर या नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022 पर्यंत मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत होत्या. आपल्या अटकपूर्व जामीन याचिकेत पेडणेकर यांनी दावा केला की, आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, त्याच्या विरुद्धची तक्रार राजकीय हेतूनं प्रेरित आहे. तर आता या प्रकरणात पुढं काय होतं हे पाहणं महत्वचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- Body Bag Scam Case : कोरोना बॉडीबॅग प्रकरणी किशोरी पेडणेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
- Covid १९ Body Bag Scam : कोरोना काळातील शवपेटी घोटाळा प्रकरण; अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकरांची उच्च न्यायालयात धाव
- Kishori Pednekar News : कथित बॉडी बॅग गैरव्यवहार प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना दिलासा, २४ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण