मुंबई - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून घरगुती गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणेश आगमन, विसर्जनावेळी पाच व्यक्तीपेक्षा जास्त लोक नसावेत. शाडूच्या लहान मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच कोरोनाचा प्रसार करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.
घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्ती असाव्यात. श्रीगणेश आगमनप्रसंगी मास्क, शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यादीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शाडूची असावी, मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरून, आगमन विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे व कुटुंबियांचे ‘कोविड-१९’ साथरोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.
मूर्ती विसर्जन घरीच करा -
घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करणाऱ्या भाविकांनी दर्शनास येणाऱ्या व्यक्तींना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे. गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. घर इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे.
विसर्जनावेळी काय करावे -
विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्क, शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत. शक्यतो लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
या कायद्यानुसार कारवाई -
बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सव प्रसंगी कोरोना विषाणुचा फैलाव होईल अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० कायद्यान्वये कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे.