मुंबई - राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. यानुसार मुंबई महापालिकेला सुमारे ६ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. ही 6 हजार झाडे लावण्यासाठी पालिका प्रत्तेक झाडावर 59 हजार खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या आज होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.
राज्यात वन क्षेत्र कमी झाल्याने तसेच झाडांची संख्या कमी असल्याने पर्यावरणात बदल झाले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार मुंबई महापालिकेला 5977 झाडे लावण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईत झाडे लावण्यासाठी जागेची कमतरता असल्याने पालिकेला वृक्ष लागवड करणे शक्य नाही.
यावर पर्याय म्हणून जपानी पद्धतीने म्हणजेच कमी जागेत जास्त झाडे लावण्याच्या "मियावाकी" पद्धतीने झाडे लावून मुंबईत झाडांची संख्या व जंगल वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 5977 झाडे लावण्यासाठी 35 कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी शहर व पश्चिम उपनगरात मे.अर्थ साल्वेजिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या कंत्राटदाराला 14.74 कोटी रुपयांचे तर पूर्व उपनगरात मे. एस्बी एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला 20.69 कोटी रुपयांचे असे एकूण 35 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.