मुंबई Navratri Festival And Chaat Puja : शहरात पहिल्यांदाच शिंदे–फडणवीस–अजित पवार महायुती सरकारच्या निर्देशानुसार मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळाची संयुक्त बैठक बुधवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतला गेल्याचं बोललं जात आहे.
बैठकीत काय झाले निर्णय : नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. बिगर व्यावसायिक नवरात्री मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येणार आहे. नवरात्रीत दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इत्यादी व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येणार आहे. तसंच पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेवला जाईल. वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था याकडे विशेष लक्ष वाहतूक पोलीस देतील. छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयाच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनाच्या वेळी महिला सुरक्षेसाठी महापालिका व पोलीस प्रशासन यंत्रणांकडून जनजागृती बॅनर्स लावण्यात येणार असल्याचेही अॅडवोकेट आशिष शेलार यांनी सांगितले.
नवरात्रोत्सव मंडळाकडून आभार : मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्री मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार व महायुती सरकारचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हिंदू सणाबाबत तातडीने निर्णय घेतले. याविषयी सर्व नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळांनी त्यांचे आभार मानले.
हेही वाचा:
- Tuljapur Bandh : तुळजापूरमध्ये कडकडीत बंद; तुळजाभवानी दर्शन मंडपावरून वाद पेटला, पुजारी-व्यापाऱ्यांसह स्थानिकांची नाराजी
- Chaitra Navratri 2023: कौडण्यपूरच्या अंबिका मंदिरात नवरात्रोत्सव; याच मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे केले होते हरण
- Dasara Melava and Devi Visarjan दसरा मेळावा आणि देवी विसर्जनानिमित्त नवी मुंबईत जडवाहनांना प्रवेशबंदी