मुंबई : मुंबईमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या कमी आहे. शहरात केवळ ३० लाख झाडे आहेत. यामुळे स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनची नेहमीच समस्या असते. यासाठी महापालिका मुंबई हिरवीगार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार केला असून इमारतीच्या टेरेसवर, खिडकीमध्ये हिरवळ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे कमी जागेत जास्त झाडे लावण्यासाठी मियावादी पद्धतीने झाडे लावण्याचे निश्चित केले आहे.
झाडे तोडीची माहिती द्या : मुंबईमध्ये एकीकडे झाडांची संख्या कमी असताना होळी या सणाच्या निमित्ताने झाडे तोडली जातात, अशी झाडे तोडणे बेकायदेशीर आहे. वृक्षतोड केल्यास गुन्हा दाखल केला जातो. मुंबईत कोठेही वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी महानगरपालिका विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना, स्थानिक पोलीस ठाण्याला कळवावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. होळी सणासाठी झाडांची कत्तल होऊ नये म्हणून महापालिका सतर्क झाली आहे. होळीसाठी झाडे तोडल्यास कारवाई होणार आहे.
दंड, कैदेची शिक्षा : बेकायदेशीर झाडे तोडण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार कारवाई केली जाते. या कायद्याच्या कलम २१ अन्वये झाडे तोडणे हा गुन्हा आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा कलम २१ अन्वये अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी रुपये १ हजार रुपयेपासून ५ हजार रुपयेपर्यंत दंड आकाराला जातो. तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
'मियावाकी वन' विकसित केले जाणार : मुंबईमध्ये १० हजार चौरस मीटर जागेच्या भूखंडावर इमारत बांधताना विकास नियंत्रण नियमावलीच्या नियमात ५ टक्के इतकी जागा खुली जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या जागेवर मियावाकी पद्धतीने झाडे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. इमारत बांधकाम करताना आयओडी अटींमध्ये मियावाकी वन उभारणे सक्तीचे करण्यात आले आहे. सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.