मुंबई : या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तींची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मुंबईत वस्ती पातळीवर पोहोचून सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून त्या आधारे मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पहिल्या सर्वेक्षणात १२ राज्यांचा समावेश : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण सन २०१५-१६ मध्ये करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशातील १२ राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार, मनोविकारांचे प्रमाण हे शहरी भागात १४ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्के इतके आढळले. ज्यात चिंता (नर्व्हस्), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्यसेवन यांचा समावेश होता. यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली होती. औषधे, मानसोपचारतज्ञ, मानसशात्रज्ञ व मानसोपचार परिचारिका यांची मोठी कमतरता सर्वच राज्यांमध्ये आढळून आली.
सर्व्हेक्षणासाठी नायर रुग्णालयाची निवड : पहिल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली ही निरीक्षणे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील महानगरांमधील परिस्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने दुसरे सर्वेक्षण हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरु, चेन्नई व कोलकाता या महानगरांमध्ये हे सर्वेक्षण राबवण्याचे निश्चित केले आहे. मुंबई महानगरातील सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचा मनोविकृतीशास्त्र विभाग व जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण नुकतेच सुरू केले आहे.
असे होणार सर्व्हेक्षण : वस्ती पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी १ मुख्य समन्वयक आणि ७ क्षेत्रीय कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने निवडलेल्या निवडक कुटुंबातील व्यक्तींच्या मुलाखती घेतील. मुलाखतीसाठी संमती दिल्यानंतर त्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येतील. सर्वेक्षणासाठी मंत्रालयाने ठरवून दिल्यानुसार सुमारे ३ हजार ६०० व्यक्तींची मुलाखत यामध्ये घेतली जाईल. एका व्यक्तीच्या मुलाखतीस सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागेल. समाजातील सर्व स्तरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोविडमुळे झालेल्या मानसिक परिणामांसंबंधी प्रश्नही यात समाविष्ट केले आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर २०२३ पर्यंत म्हणजे येत्या ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे : नायर रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ, रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र तज्ज्ञ व महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्रितरित्या महाराष्ट्र व मुंबईतील मानसिक आरोग्यसेवेच्या स्थितीचा आढावा घेतील व आरोग्य सेवेतील त्रुटींचे प्रमाण निश्चित करतील. या सर्वेक्षणामुळे महानगरांतील मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करता येणार आहे. हे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने मुलाखतीसाठी आपल्या घरी कर्मचारी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने पालिकेने केले आहे.