मुंबई - महापालिकेच्या सफाई विभागात लिपिक, मुख्य लिपिक आदी १३८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कोरोना योद्धा असलेला सफाई कामगार निवृत्त झाल्यावर किंवा त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला तसेच त्याच्या वारसांना थकबाकी, पेंशन, अनुकंपा नोकरी मिळण्यास अडचणी येत आहेत. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयात असे शेकडो प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर, पालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष यांनी लक्ष घालून कोरोना योध्या सफाई कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी सफाई कामगार विकास संघचे अध्यक्ष सुनिल चौहान यांनी केली आहे.
सफाई कामगारांचे हाल -
जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानीही आहे. यामुळे या शहराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम ४० हजार कर्मचारी करत होते. आता ही संख्या कमी झाली असून २८ हजार कर्मचारी सफाईचे काम करत आहेत. इतर कंत्राटी कामगारही सफाईच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबईमधील कचरा, घाण स्वच्छ करताना आरोग्यावर परिणाम होऊन दरवर्षी ३०० कामगारांचा मृत्यू होतो. तर १२०० कामगार निवृत्त होतात. त्यातच आता गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार असताना मुंबई स्वच्छता ठेवताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे.
क्लार्क पदे रिक्त, प्रस्ताव रखडले -
सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या वारसांना थकबाकी तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी, प्रॉव्हिडंट फंड, पेंशन आदी रक्कम दिली जाते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची सर्व कागदपत्रे एकत्र करून त्याचा तसा प्रस्ताव तयार करावा लागतो. हे काम पालिकेच्या सफाई विभागातील क्लार्क, हेड क्लार्क आदी कर्मचारी करतात. मात्र पालिकेच्या २४ विभागात क्लार्कच्या १२४ तर हेड क्लार्कच्या १४ अशा एकूण १३८ जागा रिक्त आहेत. यामुळे कोरोना काळात सफाई कामगारांचा मृत्यू झाला, ते निवृत्त झाले तरी त्यांना व वारसांना थकबाकी, पेंशन, प्रॉव्हिडंट फंड आदी रक्कम मिळाली नाही. तसेच त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही मिळालेली नाही.
पदोन्नतीही रखडली -
सफाई कामगारांना वेळेवर पदोन्नती दिली जात नाही. यामुळे बहुतेक सर्वच सफाई कामगार म्हणून निवृत्त होतात. त्यांना वेळेवर पदोन्नती देण्याची गरज आहे. मात्र पदोन्नती दिली नसल्याने दुमरे ५०० मुकदामांची पदे रिक्त आहेत. सफाई कामगारांच्या कालबध्द पदोन्नतीकडेही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
हेही वाचा - केंद्र सरकारने 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी दिले - राजेंद्र शिंगणे