मुंबई - देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेने कराचे संकलन वाढविण्याकरिता कारवाईंचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या ६७ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्ताधारकांकडे मिळून २६७ कोटी ८८ लाख रुपयांचा मूळ कर बाकी आहे. तर ८७ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड आहे. एकंदरीत महापालिकेने थकबाकीदारांकडे एकूण ३५५ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. त्यामुळे या संपूर्ण रकमेच्या वसुलीसाठी या ६७ थकबाकीदारांच्या इतर मालमत्ता व गुंतवणुकीचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेने व्यावसायिक संस्थेच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.
जकात बंद झाल्यानंतर पालिकेला कोट्यवधी रुपयाच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे पालिकेने अधिक लक्ष दिले आहे.
महापालिका अशी करणार कारवाई -
- मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर न भरल्यास महापालिकेकडून नियमानुसार टप्पेनिहाय कारवाई करण्यात येणार आहे.
- महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.
- त्यानंतरही मालमत्ता कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते.
- यावरही प्रतिसाद न मिळाल्यास पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकाला २१ दिवसांची शेवटची नोटीस दिली जाणार आहे.
- थकबाकीदारांनी मालमत्ता कर नाही भरल्यास पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्ती, लिलाव अशी थेट कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जात असल्याने वसुली लवकर होते.
थकबाकीसाठी आणखी होणार कठोर कारवाई - निवासी, औद्योगिक, वाणिज्य, खुली जागा अशा विविध वर्गवारी अंतर्गत असणा-या ६७ थकबाकीदार धारकांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांकडे मिळून असलेली संपूर्ण ३५५ कोटी १९ लाख रुपयांची वसूली करता यावी म्हणून या ६७ थकबाकीदारांच्या नावे असणाऱया इतर स्थावर मालमत्ता व गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. थकबाकीदारांच्या नावे नोंदणीकृत व्यवहार केलेल्या स्थावर मालमत्तांचा शोध घेणे, त्या नोंदणीकृत मालमत्तांच्या मालकीचे कागदोपत्री पुरावे गोळा करणे, थकबाकीदारांचे हितसंबंध आणि संचालक पद आहे, अशा व्यावसायिक संस्थांचा शोध घेतला जाणार आहे.
कठोर कारवाईचे आदेश मालमत्ता कर थकबाकीदारांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. मालमत्ता कर थकविणाऱया आणि वारंवार मागणी करूनही मालमत्ता विषयक विविध करांचा भरणा न करणाऱयांवर सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण व संकलन खात्यातर्फे धडक कारवाई हाती घेण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.