मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागल्याने वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक व कार्यालयीन ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
...तरच संकटावर मात करणे शक्य
दैनंदिन व्यवहारात 'कोरोना' प्रतिबंधाबाबत शिथिलता आलेली दिसते. मुंबईत त्याचे दुर्दैवी परिणाम दिसायला लागले आहेत. रुग्ण संख्या ही पूर्वीपेक्षा तिप्पट होत आलेली आहे. यात मुंबईकर नागरिकांचे पूर्वी प्रमाणे सक्रिय सहकार्य मिळाले, तरच या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. कारण यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईकरांना आज अधिकाधिक स्वयंशिस्तीची गरज आहे. मुंबईकर यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिकेस आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधाबाबत मनातील शिथिलता घालवून स्वयंशिस्तीने मात करण्याची गरज आहे. कोविड लस आली असली तरी कोरोनासोबत पुन्हा नव्याने जगायला शिकण्याची गरज आहे, असे काकाणी यांनी म्हटले आहे.
त्रिसूत्रीची अंमलबजावणी करा -
वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी. त्यासाठी 'फेस मास्क' नियमितपणे व योग्य वापर करावा, नागरिकांनी आपापसात किमान २ मीटरचे सुरक्षित अंतर ठेवावे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत. तसेच 'सॅनिटायझर' चा योग्यरित्या वापर करावा. जोवर कोविड विषाणूवर परिपूर्ण नियंत्रण येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करुन या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाला आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
३५ लाख मुंबईकरांची माहिती -
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षभरात ४१ लाख ७४ हजार २५९ नागरिकांची कोरोना चाचणी केलेली आहे. तसेच ५३ लाख ५२ हजार ५२१ लोकांचे विलगीकरण केलेले आहे. महापालिकेने दररोज १ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत १२ लाख ६० हजार ३८७ नागरिकांचे लसीकरण केले आहे. तर २ वेळा सुमारे ३५ लाख मुंबईकर नागरिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तपासणीसह कोरांना विरोधाच्या लढाई विषयी जागृती आणि माहिती गोळा केलेली आहे.
अशी घ्या काळजी -
वैयक्तिक स्तरावरची काळजी
1) रोज सकाळी शरीराचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल प्राणवायू पातळी मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे.
2) मास्कचा सदैव उपयोग करावा. मास्क काढून ठेवू नये. नाकाखाली/चेह-याखाली मास्क न ठेवता सुयोग्यय प्रकारे लावावा. याबाबत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविषयी काळजी घ्यावी.
3) चेह-याला तसेच मास्कला वारंवार हात लावू नये.
4) एकदाच वापरात येणारे मास्क (सिंगल यूज मास्क) वापरुन झाल्यानंतर ते टाकून देण्यापूर्वी, त्यावर निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्यांचे तुकडे करुन नंतर टाकावेत. जेणेकरुन त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी गैरउपयोग केला जाणार नाही.
5) सॅनिटायझरची लहान बाटली सातत्याने सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा.
6) हातांची नियमितपणे स्वच्छता राखावी. साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवावेत. हात धुण्यासाठी सॅनीटायझर व साबण असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याास साबणाने हात धुण्यास प्राधान्य द्यावे.
7) स्वच्छ हातरुमाल बाळगावा. सर्दी, खोकला असल्यास स्वच्छ मास्क, रुमाल यांचा सातत्याने उपयोग करावा.
8) कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो वेगवेगळ्या स्वरुपाचे किंवा वेगवेगळ्या रंगाचे मास्क वापरावे अथवा प्रत्येकाने आपल्या मास्कला वेगळी स्वतंत्र खूण करावी. जेणेकरुन प्रत्येकाचा मास्क ओळखला जाईल. एकमेकांचे मास्क वापरु नये.
9) कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेह-याकडे थेटपणे बघू नये
10) जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत.
11) जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे. तसेच शक्य असल्यास जेवण करताना समोरासमोर बसू नये.
12) जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ असावेत.
13) पुरेसा व योग्यवेळ आहार, पुरेशी झोप, व्यायाम - योग - प्राणायाम आदीद्वारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी.
14) कोणतेही वाहन चालवताना, वाहनांतून प्रवास करतानाही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कारण वाहन थांबवून वाहतूक पोलीस किंवा इतरांशी बोलताना नकळत मास्क नसल्यास संसर्गाचा धोका पोहोचतो.
15) बंदिस्त वातावरण टाळावे. याचप्रमाणे गर्दीत जाणे किंवा निकटचा संपर्कही टाळावा. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर शक्यतो टाळावा.
16) अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नये.
17) चालायला-धावायला गेल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी व्यक्ती व सुरक्षित अंतरावर असतील, असे पहावे.
18) सार्वजनिक ठिकाणी वावरताना थुंकू नये.
19) दरवेळी बाहेरून/कार्यालयातून घरी परतल्यावर सर्वप्रथम आंघोळ करावी व कपडे धुण्यासाठी थेट एका बादलीमध्ये टाकावेत.
20) बाहेरून आलेल्या व्यक्ती घरात प्रवेश केल्यानंतर थेट स्नानगृहात जाताना ज्या ज्या ठिकाणावरून चालत गेली असेल, ती जागा प्रथम साबणाच्या पाण्याने पुसून घ्यावी. त्यानंतर केवळ पाण्याने भिजवलेल्या ओल्या फडक्याने व नंतर कोरड्या फडक्याने पुसून कोरडी करावी
21) कोविड विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असणा-या परिसरांना/शहरांना/राज्यांना/ देशांना भेट देणे टाळावे.
22) जर 'कोविड - १९' ची लक्षणे असतील, तर आपण कुठे-कुठे गेलो होतो आणि कोणा-कोणाला भेटलो, ते आठवावे. शक्यतोवर भेटीच्या नोंदी ठेवाव्यात.
23) शक्यतो बाहेर जाणार्या व्यक्तीने सकाळी आणि सायंकाळी कोमट पाणी पिणे आणि गरम वाफ घेणे योग्य राहील.
24) शक्यतो घरचे खाणे व घरचे पाणी पिणे यास प्राधान्य द्यावे. घराबाहेर पडताना आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्याने भरलेली बाटली सोबत ठेवावी. जास्त वेळ बाहेर राहणार असल्यास घरूनच जेवणाचा डबा सोबत घेऊन निघावे. घरी परतल्यावर ही पाण्याची बाटली किंवा जेवणाचा डबा साबणाच्या द्रावणाने नीट धूवून व पुसून घ्यावा.
सोसायटी/वसाहतींमध्ये घ्यावयाची काळजी
1) सोसायटी/वसाहतीमध्ये वावरताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचेे परिपूर्ण पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी नियमितपणे करावी.
2) घराबाहेर पडताना प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्क व हातमोज्यांचा योग्यरित्या वापर करुन बाहेर पडावे.
3) सोसायटीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
4) सोसायटी/वसाहतीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावाा.
5) सोसायटींमधील प्रतीक्षागृहाचा शक्यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.
6) सोसायटीत दरवाज्याचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड रेलिंग), लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.
7) सोसायटीतील उद्वाहन (लिफ्ट) चा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपट्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्या डब्यात टाकावेत.
8) सोसायटीतून/वसाहतीतून पुन्हा घरात येताच कुठेही स्पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
9) सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.
10) बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वच्छ धुण्याची सोय आदी बाबी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी.
11) ऑनलाईन पार्सल मागवल्यानंतर, सोसायटीमध्ये ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे / सुरक्षित अशा एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्यावे. शक्य असल्यास काही तास ते पार्सल खुल्या जागेत/ राहू द्यावे आणि नंतर घरात न्यावे.
12) सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्पर्श करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
13) नजीकचे महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम), आदी महत्त्वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.
दुकाने / मंडया / मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना
१) बाजारपेठेत खरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे. तसेच कमी गर्दीच्या वेळी जावे.
२) दुकानांबाहेर तसेच आतमध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल, याची काळजी घ्यावी. गर्दी असल्यास तिथे प्रवेश करु नये. लिफ्टऐवजी शक्यतो जिन्यांचा वापर करावा. कठड्यांना स्पर्श करु नये.
३) खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.
४) खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाइन पद्धतींचा वापर करणे.
५) खरेदी करुन आणलेल्या वस्तू काही काळ घराबाहेर / मोकळ्या जागेत / जिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
६) दुकानदार/व्यावसायिक यांनी मास्क न लावलेल्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
७) दुकाने/मंडया/संकूल येथे सुरक्षित अंतराच्या खुणा करुन मर्यादीत ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.
८) दुकानात प्रवेश करणाऱया प्रत्येकासाठी शारीरिक तपमान, सॅनिटायझर यांची व्यवस्था करावी.
९) दुकाने/मंडया/संकूल येथे मर्यादीत संख्येनेच नोकर/मदतनीस यांची नियुक्ती करावी.
१०) व्यवहारांसाठी शक्यतो ऑनलाईन/डिजीटल पद्धतींचा अवलंब करावा. कमीत कमी चलन हाताळावे लागेल, याची काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येतो.
कार्यस्थळी/कार्यालयांमध्ये घ्यावयाची खबरदारी
१) कार्यालय प्रमुखांनी सर्व कर्मचा-यांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याप्रमाणे कामकाजाची रचना करावी.
२) शक्यतो आळीपाळीने व गरजेनुसार कर्मचा-यांना कार्यालयात बोलवावे. कामकाजाच्या वेळा विभागून द्याव्यात.
३) कार्यालयांमध्ये शारीरिक तापमान, प्राणवायू पातळी आदींची तपासणी, निर्जंतुकीकरण द्रव्य यांची संयंत्रे सर्वांसाठी उपलब्ध असावीत.
४) बैठकांसाठी दूर-दृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धत उपयोगात आणावी.
५) कामकाजामध्ये शक्य तितका मानवी संपर्क कमी करुन डिजीटल पद्धतींचा उपयोग करावा.
६) कार्यालयाची हवा कायम खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवणे. वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळावा.
७) आत्यंतिक गरज नसल्यास, कार्यालयीन कामकाजविषयक दौरे टाळावेत.
८) कर्मचा-यांनीदेखील शक्यतो घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे. (वर्क फ्रॉम होम).
९) शक्य असेल त्यांनी कामावर जाताना दुचाकीने, सायकलीने जाणे किंवा पायी चालत जाणे योग्य.
१०) कमी गर्दीच्या वेळी प्रवास करावा.
११) कार्यालयात मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतरावर बैठक व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे या बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावे.
१२) कार्यालयात बैठकीत सहभागी असल्यास, त्यादरम्यान 'फेस मास्क' चा वापर करणे. सुरक्षित अंतरावर बसावे.
१३) येणा-या अभ्यागतांशी संवाद साधताना सुरक्षित अंतर राखून संवाद साधावा.
१४) आपल्यासमवेत इतर सहका-यांनीही शारीरिक तापमान, प्राणवायू पातळी इत्यादी मोजली आहे किंवा नाही, याची त्यांना आठवण करुन द्यावी.
१५) कार्यालयात शक्यतो एकत्रित जेवायला बसू नये.
१६) कार्यालयांमध्ये लिफ्टचा कमीतकमी उपयोग करावा. लिफ्टमध्ये मोजक्याच व्यक्तींनी व एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे राहून उपयोग करावा. लिफ्टच्या बटनांचा उपयोग करताना कागदी तुकड्यांचा उपयोग करावा.
१७) शक्य असेल तेथे लिफ्टमध्ये फूट ऑपरेटेड बटने बसवून घ्यावीत.
खासगी/सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची दक्षता -
१) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असताना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये.
२) मास्कसमवेत फेसशिल्डचाही उपयोग केल्यास उत्तम.
३) सार्वजनिक वाहनात पुरेशा रिकाम्या जागा उपलब्ध असल्यास एका आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे.
४) वाहनांमध्ये गर्दी करुन, दाटीवाटीने प्रवास करु नये. असा प्रवास टाळणे उत्तम.
५) वाहनांमध्ये दरवाजा, कठडा यांना शक्यतो स्पर्श करु नये. स्पर्श करावा लागणार असल्यास त्या आधी व वाहनातून उतरल्यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.