मुंबई BMC Khichdi Scam Case : उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांची बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेशी संबंधित कथित खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आहे. अमोल कीर्तिकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असून ते ठाकरे गटाचे उपनेते आहेत. त्यामुळेच अमोल कीर्तिकर यांच्यामागं चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. नुकतीच युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांची देखील खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली होती.
आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची चौकशी : कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं अमोल कीर्तिकर यांना समन्स देऊन बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. याआधी दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.
खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा : कथित कोवीड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तीकरांची बुधवारी सहा तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाकडून सरकारवर मोठी टीका करण्यात येत आहे.
100 कोटींचा कोवीड काळात घोटाळा : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कोवीड काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. महानगरपालिकेचा 100 कोटींचा कथित कोवीड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब स्थलांतरित कामगारांसाठी ज्यांचं स्वत:चं मुंबईत घर नाही, त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. मात्र या कंत्राटात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
खिचडी बनवण्याचं 52 कंपन्यांना कंत्राट : कामगारांना जेवण देण्यासाठी भारत सरकारचंही समर्थन होतं. या स्थलांतरित कामगारांना खिचडी बनवण्याचं कंत्राट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असा मुंबई महानगरपालिकेनं दावा केला आहे. मात्र, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचीच चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कथित खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, राजीव साळुंखे यांच्यासह काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :