मुंबई : टोलेजंग इमारतीमुळे मुंबईकरांना उद्याने व मैदानात जाणे म्हणजे मोठी आनंदाची बाब असते. मुंबईकर विरंगुळाचे ठिकाण म्हणून मुंबईकर उद्याने आणि मैदानात जातात. ही उद्याने आणि मैदाने दिवसाला आणि सायंकाळी काही ठराविक वेळी खुली ठेवली जात होती. त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होत नव्हता. कोरोना व इतर विषाणुचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सुदृढ आरोग्यासाठी निर्णय - देशाच्या आर्थिक राजधानीत मार्च २०२० पासून कोविड म्हणजेच कोरोनाचा प्रसार झाला आहे. या प्रसारादरम्यान नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी निरोगी जीवनासाठी मैदान व उद्यानांत जाण्यास सुरुवात केली. सुदृढ आरोग्यासाठी जागरुक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेत जास्तीत-जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली असावीत, असा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, पूर्व उपनगरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाने घेतला आहे. ही माहिती उद्यान विभागाचे उपआयुक्त किशोर गांधी यांनी दिली.
पार्कसह उद्यानाचा वेळ वाढवला - सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. वाढीव वेळेत नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. मुंबईत एकूण २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. ही उद्याने सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत खुली ठेवली जात होती. मैदाने आणि उद्याने खुली ठेवण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या परिपत्रकात काय म्हटले आहे?
- महापालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवार, रविवार पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असणार आहेत.
- बदललेल्या वेळा उद्याने आणि मैदानांच्या बाहेर लावण्यात याव्यात.
- उद्यान, मैदान खुली ठेवण्याच्या वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करु शकणार आहेत.