मुंबई : शहरात अनेक महिला काम करण्यासाठी येतात. त्यांना मुंबईमध्ये सुरक्षित निवारा मिळावा म्हणून पालिकेने सात ठिकाणी हॉस्टेल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर, केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ घोषणा न राहाता महिला आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा निर्माण झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया महिला संघटनांनी पालिकेच्या या निर्णायाचे स्वागत करताना दिली आहे.
कामगार महिलांसाठी हॉस्टेल : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या ठिकाणी विविध ठिकाणाहून लोक व्यवसाय आणि नोकरीसाठी येतात. मात्र या शहरात घरे भाड्यावर घेणे परवडत नसल्याने अनेकांना मुंबईच्या बाजूच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, कर्जत कसारा पासून लोक निकरीसाठी मुंबईत येतात. विशेष म्हणजे एकट्या महिलांना हा प्रवास त्रासादायक असतो. एकट्या महिलांना घरेही भाड्यावर मिळत नाहीत. त्यामुळे तीन ते चार महिलांना एकत्र येऊन घर भाड्यावर घ्यावे लागते. काम करणाऱ्या महिलेला मुलं असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठीही घरी कोण नसल्याने त्याची कुचंबणा होते. यावर उपाय म्हणून महापालिकेने एकट्या महिलांसाठी मुंबईत ७ ठिकाणी हॉस्टेल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ठिकाणी हॉस्टेल बांधण्यासाठी पालिकेने २१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पाळणाघर आणि केअर सेंटर : काम करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांचा दिवसभर सांभाळ कसा करायचा असा प्रश्न असतो. यासाठी महिला आपल्या मुलांना खासगी पाळणाघरात ठेवतात किंवा एखाद्या महिलेला मुलांना सांभाळण्यासाठी घरी ठेवतात. यावर महिलांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. पाळणाघर आणि घरी मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिला मुलांची चांगली काळजी घेत नाहीत काही ठिकाणी मुलांना मारहाण होते असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशा वेळी मुलांची काळजी घेता यावी म्हणून पालिकेने मुंबईत सात ठिकाणी पाळणाघर आणि केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई महानगर पालिका ७ कोटी रुपये खर्च करणार आहे.
अभिमानस्पद आणि आनंददायी निर्णय : एकट्या काम करणाऱ्या महिला आणि लहान मुले असलेल्या काम करणाऱ्या महिलांसाठी मुंबई पालिकेने वसतिगृह, पाळणाघर आणि केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अभिमानस्पद आणि आनंददायी आहे. महिलांसाठी मुंबईमध्ये होस्टेल कमी आहेत. जी हॉस्टेल आहेत ती महाग असल्याने महिलांना भाडे भरणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेने महिलांचा विचार करून हॉस्टेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी ही हॉस्टेल फायदेशीर आणि कमी खर्चात उपलब्ध व्हावीत. काम करणाऱ्या महिलांचे यामुळे पैसे वाचले पाहिजेत. हॉस्टेलचे डिझाईन बनवताना महिलांची मते घ्यावीत. नुसते सीसीटीव्ही लावून प्रश्न सुटत नाहीत. इतरही सुरक्षेच्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया कोरो इंडिया या संघटनेच्या प्रोग्राम लिडर मुमताझ शेख यांनी दिली आहे.
केवळ घोषणा ठरू नये : पालिकेने महिलांसाठी हॉस्टेल आणि पाळणाघर बांधण्याची घोषणा केली आहे. हा आनंददायी आणि स्वागताहार्य निर्णय आहे. मुंबईमध्ये कामकाजी महिलांसाठी जी वसतिगृह आहेत ती तुटपुंजी आहेत. हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागते. महिलांसाठी हॉस्टेल कमी असल्याने चार ते पाच महिलांना एकत्र राहावे लागते त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. महिलांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सुरक्षा निर्माण करून देण्याचे हे सरकार, प्रशासनाचे काम आहे. ही केवळ घोषणा ठरू नये, या घोषणेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हॉस्टेलमध्ये महिलांना सुरक्षा चांगले अन्न मिळावे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नशाबंदी संघटनेच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.
हेही वाचा : Pollution in Mumbai: मुंबईत प्रदूषण करणाऱ्यांवर १ एप्रिलपासून कारवाई, जी २० साठी पुन्हा सुशोभीकरण