मुंबई - जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेकी स्थळावर बॉम्ब हल्ले केले. हवाई दलाने केलेल्या या कामगिरीबद्दल मुंबई महापालिकेकडून अभिनंदन करण्यात आले.
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडताना भारतीय हवाई दलाने आज पाकिस्तानवर जो हवाई हल्ला केला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिनंदनास पात्र असल्याचे सांगत त्यांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना भाजपचे गटनेते मनोज कोटक म्हणाले, अतिरेकी हल्ल्यानंतर सर्व थरातून पाकिस्थानला धडा शिकवा, अशी मागणी होत होती. पाकिस्तान आपल्याविरोधात कधीही जिंकू शकला नाही. ३ वेळा त्याचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी कायम अतिरेकी हल्ले केले. मुंबईने तर खूप भोगले आहे. त्यावेळी आपण चोख उत्तर दिले नाही म्हणून त्यांची हिम्मत वाढली. गेल्या ७० वर्षात, असा सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. पुलवामा हल्ला हा त्यांचा १०० वा अपराध होता. त्यामुळे पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना चांगलाच धडा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनीही या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा दिला. पाकिस्तानमध्ये जाऊन हवाई हल्ला केल्याबद्दल त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले. हा भाजपचा दुसरा सर्जिकल स्ट्राइक असून यामुळे एक चांगला संदेश जाईल, असे ते म्हणाले. मात्र, अतिरेक्यांनी केलेला हल्ला निंदनीय असल्याचे सांगत, असे हल्ले होऊ नयेत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे रवी राजा म्हणाले. आजच्या हल्ल्याचे अभिनंदन करताना त्यांनी कोटक यांचा ७० वर्षात सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचा दावा खोडून काढला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धामध्ये अर्धा पाकिस्तान जिंकून पाकिस्थानचे २ तुकडे करत बांगलादेशची निर्मिति केल्याची आठवण राजा यांनी कोटकांना करून दिली.
भाजपची घोषणाबाजी -
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी 'भारत माता की जय', 'भारतीय वायू सेनेचा विजय असो' या घोषणा पालिका मुख्यालय आणि सभागृहात दिल्या. यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीचा आम्हालाही नगरसेवक म्हणून अभिमान आहे. त्याचा आनंद साजरा करत असल्याचे भाजप गटनेते मनोज कोटक यांनी यावेळी सांगितले.