मुंबई- महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा महानगरपालिका नगरसेवक गटातर्फे गटनेता प्रभाकर शिंदे व नगरसेवक यांनी महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 36 ( ह ) अन्वये तातडीची सभा घेऊन त्यात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची चर्चा करण्यासाठी महापौरांनी त्वरीत प्रत्यक्ष बैठक लावावी, अशी मागणी भाजपा नगरसेवकांकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.
भाजपा ने दिलेल्या पत्रात महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास व्यक्त करत आहे, असे म्हटले आहे. मार्च 2020 पासून आजपर्यंत गेल्या सहा महिन्यांत कोविड महामारीचा सामना करण्यात महापालिकेतील सत्ताधारी पक्षाला आलेले अपयश , वाढता मृत्युदर , वाढती रुग्णसंख्या , अपुरी आरोग्य यंत्रणा , निष्क्रीय प्रशासन , उदासीन सत्ताधारी आणि कोविडच्या नावाखाली जंबो भ्रष्टाचार, या अपयशाला जबाबदार असणाऱ्या मुंबईच्या महापौर यांच्यावर अविश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव भाजपाने मांडला आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
भोजन से कफन तक अशा प्रकारचा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला आहे. मुंबई महापालिकेतील लोकप्रतिनिधींना या विषयावर चर्चा करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध झालेले नाही. शहरातील जनतेसमोर हे सर्व विषय जावेत म्हणून महापौरांवर अविश्वास ठराव आणल्याचे प्रभाकर शिंदेनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटात मुंबईकर जनतेला आर्थिक दिलासा देण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी मालमत्ता करात सूट देण्याची मागणी केली. जलदेयकात वाढ करु नये अशी मागणी देखील भाजपाने महापालिका, महापौर आणि राज्य सरकार यांच्याकडे केल्या आहेत. भाजपाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आणि महापालिका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर यांचावर विविध आरोप केले. भाजपाचे स्थायी समिती सदस्य ज्योती अळवणी, कमलेश यादव, अॅड.मकरंद नार्वेकर, आदी नगरसेवक तसेच वरिष्ठ भाजपा नेते उपस्थित होते.