मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना डॉक्टरांची कमतरता आहे. यावर पर्याय म्हणून मुंबई महापालिकेने वरळीतील एनएससीआय, बीकेसी, नेस्को, मुलुंड आणि दहिसरमधील कोरोना केंद्रांमधील आयसीयूमधील कोरोना रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी खासगी वैद्यकीय आणि निमवैद्यकीय तज्ञांची नियुक्ती केली आहे. या केंद्रात खासगी तज्ञांची नियुक्ती केली असली तरी पायाभूत सुविधा, औषधांचा पुरवठा पालिकाच करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती हॉस्पिटल आणि कोरोना केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांमध्ये सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड सह आयसीयू कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयांवरील ताण कमी झाला असून रुग्णांना त्यांच्याच परिसरात जलद गतीने उपचार मिळू लागले आहेत.
कोरोना केंद्रात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना अधिक चांगली सेवा देता यावी, यासाठी पालिकेने आयसीयू व्यवस्थापन करण्याचा अनुभव असलेल्या कॉर्पोरेट रुग्णालये, वैद्यकीय संस्था व व्यावसायिक, खासगी कंपन्या, भागीदारी संस्था, बिगर शासकीय संस्था, विश्वस्त संस्थांमधून एनएससीआय, बीकेसी, नेस्को, मुलुंड आणि दहिसरमधील कोरोना केंद्रांमधील ६१२ आयसीयू बेडसाठी वैद्यकीय तज्ञांची नियुक्ती केली आहे. सुरुवातीचे ६ महिने किंवा कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालकांनी निश्चित केल्यानुसार १० आयसीयू बेडसाठी १ वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, १ सहाय्यक वैद्यकीय सल्लागार, ६ निवासी वैद्यकीय अधिकारी, १० नर्स, रुग्णांची काळजी घेण्यासाठी ८ सहाय्यक मल्टी पर्पज वर्कर्स, २ तंत्रज्ञ यांची आवश्यकता असणार आहे. त्यानुसार वरळी येथील एनएससीआय मधील ५०, वांद्रे बीकेसी येथील ११२, गोरेगाव पूर्व नेस्को येथील २५०, मुलूंड केंद्र येथील १००, दहिसर केंद्र येथील १०० बेड अशा एकूण ६१२ आयसीयू बेडसाठी खासगी तज्ञांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.