मुंबई- शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यातच वरळी, धारावी सारखे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीमधील एकूण रुग्णांचा आकडा 733 वर पोहचला असून मृतांचा आकडा 21 वर पोहचला आहे. यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास मुंबई महापालिका प्रशासन हतबल झाल्याने आता लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी कोरोना रुग्णांना विनंती करून क्वारंटाइन होण्याचे आवाहन करावे असे सांगितले आहे.
मुंबईत वरळी नंतर धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. धारावीत कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत असले तरी म्हणावे तसे यश आलेले नाही. दाटीवाटीने असलेल्या वस्तीमुळे या ठिकाणी दोन लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे अशक्य आहे. यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोना विषाणूची लागण झाली तरी धारावीमधील नागरिक महापालिकेशी संपर्क साधत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका प्रशासन हतबल झाले असून आता लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांना विनंती करण्यात आली आहे.
आपल्या विभागातील नागरिकांमध्ये कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित धारावीमधील महापालिका शाळेत क्वारंटाइन होण्यास सांगावे. त्या ठिकाणी डॉक्टर्सची सोय असून, औषधोपचारही केले जातील. तसेच आवश्यकता असल्यास चाचणी केली जाईल व पुढील उपचार केले जातील, असे आवाहन जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे.