मुंबई Blinkit Online Company fined : ब्लिंकिट ऑनलाइन किराणा कंपनीनं ऑर्डरनुसार ग्राहकाला टरबूज बिया न दिल्यानं ग्राहक आयोगानं कंपनीला 8 हजारांचा दंड ठोठावला आहे. कल्पना शांतीलाल शाह असं या ग्राहकांचं नाव असून त्यांनी ग्राहक आयोगाकडं कंपनीबाबत तक्रार दाखल केली होती. यावेळी ग्राहक आयोगानं तक्रारदाराला 8 हजारांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती एस. ए. पेटकर, न्यायमूर्ती जी एम कापसे, न्यायमूर्ती प्रदीप कडू यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला.
टरबूजाच्या बिया गायब : कल्पना शांतीलाल शाह यांनी ब्लिंकिट या ऑनलाइन किराणा कंपनीकडे किराणा मालाची ऑर्डर दिली होती. त्यांना वस्तू मिळाल्या मात्र, त्यात टरबूजाच्या बिया गायब होत्या. त्यामुळं त्यांनी ग्राहक मंचाकडं तक्रार दाखल केली होती. तसंच 11 फेब्रुवारी 2020 रोजी याबाबत आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
"मी 31 रुपये किंमतीच्या टरबूज बिया मागवल्या होत्या. मात्र, किराणा साहित्यात टरबूज बिया नव्हत्या. याबाबत मी कंपनीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. त्यामुळं मी कंपनीकडून 40 हजार रुपयाची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. - कल्पना शाह, ग्राहक
ऑनलाइन कंपनीचा निष्काळजीपणा : याबाबत ग्राहक आयोगानं कंपनी तसंच तक्रारदाराची बाजू ऐकून घेतली. यावेळी आयोगानं त्यांच्या निरीक्षणात म्हटलं की, 'कंपनीनं मागणी केल्याप्रमाणे 31 रुपये किमतीच्या टरबूज बिया तक्रारदाराला देणं आवश्यक होतं. मात्र तक्रादाराला बिया मिळालेल्या नाहीत. किराणा ही रोजची गरज आहे. त्यामुळं ती वेळेवर पोहोचवणं अत्यावश्यक होतं. पण त्याकडं कंपनीनं दुर्लक्ष केलं. हे कायद्यानुसार योग्य नाही, असं आयोगानं स्पष्ट केलं.
ग्राहक आयोगाचा निर्णय : "तक्रारदार महिलेनं नियमानुसार किराणा मालाची मागणी केली होती. मात्र एक वस्तू महिलेपर्यंत पोहोचवली नाही. त्यामुळं महिलेची तक्रार वैध आहे. किराणा माल पोहोचवण्याची जबाबदारी ऑनलाइन किराणा कंपनीची आहे. त्यामुळं कंपनीला 8 हजार रुपये दंड ठोठावत आहे." या निर्णयाची अंमलबजावणी आदेशापासून 30 दिवसाच्या आत करावी असे निर्देश आयोगानं कंपनीला दिले आहेत.
हेही वाचा -