मुंबई : राज्यातील मंदिरं सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात यावी. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज (30 ऑगस्ट) राज्यभर शंखानाद आंदोलन करण्यात येणार आहे. याआधीही राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यासाठी इशारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. हॉटेल, मॉल्स आणि दारूची दुकानं सर्व अटी नियम लागू करून खुली करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली. मग मंदिरातही दर्शनासाठी अटी नियम लावून मंदिरं खुली करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. त्यामुळे आज राज्यभरात मंदिरांसमोर शंखनाद आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आला आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता, निर्बंध कडक होणार?
राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. तसेच राज्यामध्ये असलेले सण आणि उत्सव पाहता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील राज्य सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. सण आणि उत्सव साजरे करत असताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो, असं पत्र केंद्रीय स्वास्थ्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी देखील राज्य सरकारला पाठवले आहे. तसेच कर्नाटकमध्ये काही उत्सवामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध कडक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - ईडीच्या नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ - अनिल परब