मुंबई - भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अधिवेशन रविवार 16 फेब्रुवारीला स्व. राम कापसेनगर नवी मुंबई येथे होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्ते देण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत जनादेश मिळूनसुध्दा शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथीने जे नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले, त्या बाबतची स्पष्ट दिशा आणि आगामी कामाची योजना या अधिवेशनात ठरविण्यात येईल, अशी माहिती विनोद तावडे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत दिली.
या अधिवेशनासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थितीत राहणार आहेत.तर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या अधिवेशनाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी माहिती तावडे यांनी दिली. भाजपा नेते विनोद तावडे म्हणाले की, या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा -
सभा, कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांना बसण्याची मुभा द्या, पवारांचे गृहमंत्री देशमुखांना पत्र
भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे , ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभेत विस्तारक म्हणून गेली दोन वर्षे काम करणाऱ्यांची बैठक घेउन विधानसभा निवडणुकीतील समीकरणे, वास्तव चित्र यांचे विश्लेषण आणि त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन यावर चर्चा होईल.
हेही वाचा -
'आई-बाबा मला नको बंगला-गाडी फक्त शोधा व्यसनमुक्त गडी'
तसेच दुपारी 2 वाजल्यापासून राज्यातीलल भाजपा खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, महापौर, जि. प. अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांची बैठक होऊन त्यात सद्य राजकीय स्थितीवर चर्चा करून पक्षाची आगामी दिशा व धोरण ठरविले जाईल. 16 फेब्रुवारीला सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण होवून राज्य परिषद अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपचे नगरपालिका पासून ते खासदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्षांपासून जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, आघाड्यांचे संयोजक असे सुमारे 10 हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील .
या प्रतिनिधींना राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी . नड्डाजी हे मार्गदर्शन करतील . त्याच उद्घाटन सत्रात प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. राज्य अधिवेशनामध्ये दोन प्रस्ताव पारित होतील. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने महाविकास आघाडी सरकार बनविले, त्यांच्या 80 दिवसांच्या कारभाराचा पंचनामा प्रस्तावाद्वारे करण्यात येईल. तसेच सत्तेवर आल्यावर जनतेची फसवणूक कशी चालू आहे याची झाडाझडतीही या प्रस्तावाद्वारे होईल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जनहिताचे अनेक निर्णय आणि योजना राबविल्या, राममंदिरच्या निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना याबरोबरच नागरिकता संशोधन कायदा (CAA) करुन महत्वाचे ऐतिहासिक कार्य केले त्याला पाठिंबा दर्शविणारा ठराव मांडण्यात येईल, विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या बाबतीतही या अधिवेशनात चर्चा केली जाईल. या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील, अशी माहिती पत्रकार परिषद घेत तावडे यांनी दिली.