मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींची मुंबईतील रस्त्यांवर अपप्रचार करणारी चित्रे काढण्यात आली. या विरोधात भाजपा युवा मोर्चाने पोलिसात तक्रार करून अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जनमत निर्मिती करण्यासाठी पोस्टर आर्ट्स आणि वॉल पेंटिंग हे आजच्या युगात महत्त्वाचे साधन मानले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कलेचा वापर अपप्रचार करण्यासाठी देखील केला जात आहे. मुंबईतील मालाड परिसरात रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पद्मश्री पुरस्कारप्राप्त अभिनेत्री कंगणा रनौत व इतर प्रतिष्ठित व्यक्तींची विडंबनात्मक चित्र काढून अपप्रचार करण्यात आला. काल(सोमवारी) रात्री भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या परिसरात जाऊन सर्व चित्र खोडली आहेत. चित्र काढणाऱ्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चा व भाजपा आयटी सेलच्यावतीने बांगुर नगर मालाड पोलीस ठाणे येथे हे तक्रार देण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांचा काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात येत आहे. त्यांचाच अपमान करून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार याविरोधात काही कारवाई करत नाही. त्यामुळे आम्ही तक्रार दिली. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करणार आहे, असे भाजपा युवा मोर्चाचे आयटी सेल प्रमुख देवांग दवे यांनी सांगितली.