मुंबई - भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईच्या जागेवर विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या वर्धमान नगर येथील कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आनंद साजरा केला.
पालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी तर सोमय्या यांना तिकीट दिल्यास त्यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप सोमय्या यांची उमेदवारी जाहीर करण्यास कानाडोळा करत होती. अखेर शिवसेनेच्या दबावामुळे सोमय्यांचा पत्ता कट करण्यात आला.
भाजपकडून किरीट सोमय्या यांची समजुत काढण्यात आली, असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेचा रोष पत्कारून सोमय्यांना उमेदवारी देणे भाजपसाठी फायद्याचे नव्हते. त्यामुळेच मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवाय सेनेच्या दबावापुढे भाजप झुकल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.