मुंबई - राज्यात गेल्या दोन आठवड्यात महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या असून सरकार काय करत आहे? मोठ्या वल्गना केलेल्या दिशा कायद्याचे काय झाले? असा संतप्त प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. केवळ 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणून चालणार नाही. सरकारने यावर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
पारोळा येथे गेल्या आठवड्यात २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला विष पाजून मारण्यात आले. पुण्याजवळील शिरूर येथे महिलेवर बळजबरी करताना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत पीडित महिलेला अंधत्व आले, याला जबाबदार कोण? असेही त्यांनी म्हटले. मन हेलावून सोडणाऱ्या या घटना आहेत. याप्रकरणी सरकारने कारवाई करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली.
दिवाळीची भाऊबीज म्हणून सरकारने भगिनींना भयमुक्त वातावरणाची ग्वाही द्यावी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जेव्हा सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उत्तरप्रदेश सरकारच्या कारभारावर तीव्र टीका केली. पण, तेव्हाच उस्मानाबाद जिल्ह्यात आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. सत्ताधरी पक्षांचे नेते त्यावेळी उस्मानाबादमध्ये असताना त्या नेत्यांनी रुग्णालयात असलेल्या पीडित मुलीची चौकशीसुद्धा केली नाही. अतिशय संवेदनाहीन असा हा प्रकार असून सरकारने आता दिवाळीची भगिनींना भाऊबीज म्हणून भयमुक्त आणि भीतीमुक्त वातावरणाची ग्वाही द्यावी, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करण्याची घोषणा केली होती, याबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर हा कायदा लागू करावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.