रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून चांगलचं राजकारण पेटले आहे. १ मार्चला या प्रकल्पाविरोधी शिवसेना जाहीर सभा घेणार आहे. तर आता भाजपही या प्रकल्पाला समर्थन देणाऱ्यांची सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली. समर्थनाची ही सभा राजापूरमध्ये होणार आहे. सभेबाबतची तारीख आणि नेत्यांची नावे लवकरच भाजप जाहीर करणार असल्याचे लाड म्हणाले.
नाणार रिफायनरी संदर्भातील शिवसेनेची भूमिका बदलली नसून, संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेना 1 मार्चला डोंगर येथे जाहीर सभा घेणार आहे. त्यातच भाजपनेही प्रकल्पाच्या समर्थनार्थ सभा घेण्याचे जाहीर केल्यामुळे नाणारवरुन राजकारण पेटलं आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेत दुफळी माजल्याचे चित्र आहे. अनेक शिवसेना पदाधिकारी रिफायनरीच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेताना दिसत आहेत. शिवसेनेने काहींवर कारवाई देखील केली आहे. मात्र, शिवसेनेतीलच पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत असल्याने शिवसेनेवर दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. त्यामुळेच शिवसेना पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी 1 मार्चला राजापूरमधील डोंगर येथे जाहीर सभा घेणार आहे. अशातच आता भाजपही नाणारच्या समर्थनार्थ सभा घेत असल्याने भाजप-सेना संघर्ष पेटणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.