मुंबई - भाजपमध्ये सगळ्यांना आता वेध लागलेत ते पक्षांतंर्गत निवडणुकांचे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत पक्षातील या अंतर्गत निवडणुका पार पडणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत नवीन मुंबई अध्यक्ष तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. आज मुंबईतील 'वसंतस्मृती' या भाजपच्या कार्यालयात मुंबई विभागातील 6 जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
पक्षात दर 3 वर्षांनी अंतर्गत निवडणूका घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदा या निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर सत्तासंघर्ष लांबल्याने या निवडणूका आता होणार आहेत. त्यानुसार राज्यभरातील 69 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ते मंडल अध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. 30 तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड केला, त्यात गैर काय? - राम कदम
2022 च्या निवडणुकीत मुंबईत भाजपचा महापौर
आज मुंबईतील 6 जिल्हे, 36 विधानसभातील, 227 वार्डनिहाय तपशीलवार चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विजय पुराणिक यांनी मिळून हा आढावा घेतला. काहीही करून 2022 ची मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवून भाजपचा महापौर करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
'नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत'
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याची भाषा बोलून दाखवली असली, तरी तसे काहीही ते करणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. काल जळगावात नाथाभाऊसोबत या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. पक्षविरोधी काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे पुरावे त्यांनी मला दिलेत. त्यात तथ्य आढळले तर दोषींवर नक्की कारवाई करु, अस पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - 'खातेवाटप करायला महाविकास आघाडीला कसली भीती वाटते'
'अजित पवारांना आमच्याकडून कोणतीही क्लीन चिट नाही'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना भाजपने कोणतीही क्लीन चिट दिलेली नाही. ज्या गुन्हातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, ते प्रतिज्ञापत्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील नसून नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे भाजपकडून कोणतीही क्लीन चिट अजितदादांना देण्यात आलेली नाही.
'माझा बाप आणि मी'
11 दिवस उलटले तरीही महाविकास आघाडी सरकारने अजून खाते वाटप केलेले नाही. याबाबत आपले मत काय असे चंद्रकांतदादांना विचारताच, त्यांनी आपल्या खास शैलीत त्याचे उत्तर दिले, माझ्या बापाने मला कायम माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवले आहे. दुसऱ्याच्या संसारात काय चाललंय ते डोकवायला शिकवलेलं नाही, त्यामुळे मी माझ्यापुरते पाहतो. त्यांचं काय ते ते स्वतः पाहून घेतील, असे त्यांनी मत मांडले.