मुंबई - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (एससी, एसटी, ॲट्रॉसिटी) धर्तीवर कायदा बनवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज केली. या मागणीचे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत्या होत्या.
आपले सरकार किती असंवेदनशील -
महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराची चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची सूचना करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची अन्य राज्यातील घटनांशी तुलना करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आपण आणि आपले सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दाखवून दिले आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भान नाही -
यावेळी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्ला चढवत सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरात अन्य राज्यातील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काय चालू आहे हे पहात बसण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चालू आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहावे. महिलांवरील अत्याचारांचा विषय राजकारणापलीकडचा आहे, याचे भानही मुख्यमंत्र्यांनी ठेवू नये हे दुर्दैवी आहे. महिलांवरील अत्याचाराची चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज काय असा सवाल उपस्थित करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना कसलीच चाड राहिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - महिला सुरक्षेच्या मुद्यावरून भाजपच्या महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा - परमबीर सिंग यांची डोकेदुखी कायम; आणखी एका प्रकरणाची होणार खुली चौकशी