मुंबई : आपण केलं ते चांगलं आणि दुसऱ्याने केलं ते वाईट ही राजकीय प्रवृत्ती योग्य नसल्याचे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरत निवडणुकीला सामोरे गेलो. बहुमताने जिंकलो काही लोक काँग्रेसबरोबर गेले. मग तो राजकीय कलंक नव्हता का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उदय सामंत यांनी विचारला आहे. घर फोडण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी तेव्हा एकनाथ शिंदे नव्हते. क्षीरसागर कुटुंबात देखील ते निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे नव्हते व त्यांचे घर कोणी फोडले या गोष्टी महाराष्ट्राला माहिती असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे.
ठाकरे यांना इशारा : आपण किती चांगलं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. हॉस्पिटलमध्ये असताना मीटिंग झाल्याचे सांगायचे. हॉस्पिटलमध्ये किती मीटिंग झाल्या हे देखील मला काही दिवसांनी सांगावे लागेल असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तत्त्वांशी विरोध करण्यास समजू शकतो. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नसल्याचे सामंत म्हणाले.
महायुतीचे सरकार येणार : कोणी कितीही दौरे केले किंवा कितीही आगपाखड केली तरी भविष्यात लोकसभेचे 45 पेक्षा जास्त खासदार महायुतीचे निवडून येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे निवडून येणार आहेत. जनतेच्या विकासाकडे आम्ही लक्ष देतो. आपल्याकडील आमदार, खासदार टिकवण्यासाठी सर्व खटाटोप चालू आहे. अशा भाषणांकडे आम्ही दुर्लक्ष करत असल्याचाही उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदवर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच : संपूर्ण राज्यातील राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळून पाहिले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे विभागनिहाय त्यांना माहिती आहेत. कोणते आमदार कुठून निवडून आले, हे त्यांना ठाऊक आहे. समजूतदारीने आणि समन्वयाने तिन्ही नेते मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होणार आहे. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खांदेपालट होण्याचे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यासोबतच शिवसेना, भाजपाला मंत्रिपदासाठी तडजोड देखील करावी लागणार आहे, असे सामंत म्हणाले.
हेही वाचा: