मुंबई - शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच खडाजंगी उडत असते. कांदिवली येथील पावन धाम जैन मंदिरातील कोविड सेंटरवरून शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आर उत्तर वॉर्डच्या मासिक बैठकीत हा वाद झाला. ही बैठक ऑनलाइन घेण्यात आली होती. मात्र या वादामुळे पावन धाम कोविड सेंटर बंद होणार की पालिकेच्या ताब्यात जाणार यावरून चर्चा रंगू लागली आहे.
'हे' घडले बैठकीत
आर उत्तर वॉर्डच्या मासिक बैठकीत सुरू असताना वॉर्ड क्रमांक 12च्या शिवसेना नगरसेविका गीता सिंघण यांनी हरकतीचा मुद्दा उठवला होता. पावन धाम कोविड सेंटर पालिकेने ताब्यात घेऊन मोफत चालवले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. याला शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी देखील पाठिंबा दिला होता. सेंटर विशिष्ठ जाती धर्माच्या नागरिकांसाठी चालवले जात असून भाजपा याचे राजकारण करत आहे, असा आरोप सिंघण यांनी केला आहे. हरकतीच्या मुद्द्याला भाजपा नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. भाजपा नगरसेवक हरीश छेडा यांनी नगरसेवकांचे आरोप खोडत या कोविड सेंटरमध्ये योग्य प्रकारे उपचार मिळत आहेत, उत्तम डॉक्टर आणि सुविधा आहेत, असे त्यांनी सांगितले. हे कोविड सेंटर बंद करण्याची तयारी विश्वस्तांनी सुरू केली आहे. स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी आणि आम्ही करोडो रुपये खर्च करून हे सेंटर उभारला आहे. यामध्ये आम्ही कोणतेही राजकारण केले नाही, असे पावनधाम कोविड सेंटरचे विश्वस्त निरव दोषी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द