मुंबई MNS vs BJP : दिवाळीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्षांनी राज्यात विविध ठिकाणी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मुंबई भाजपातर्फे सुद्धा मुंबईच्या शिवडी-लालबाग या परिसरामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वतीनं 'नमोस्तव' नावाने अर्थात दीपोत्सव साजरा केला गेला. या कार्यक्रमानंतर बोलताना आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वतीनं गुरुवारी शिवाजी पार्कवर झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावर टीका केली. दरम्यान, यावरुन आता मनसे आणि भाजपामध्ये वादाचे फटाके फुटत असल्याचं बघायला मिळतंय.
काय म्हणाले आशिष शेलार : याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, दीपोत्सवाचे कार्यक्रम कोणीही करू दे. कुठल्याही पक्षांनी करू दे. पण आपल्या कार्यक्रमांमध्ये फरक कसा असतो ते बघा. कलाकार हा कलाकार असतो, त्याला जात, धर्म, भाषा, भेद नसतेच व ती असूही नये. पण फरक एवढाच आहे की, अति विनम्र व आदरानं सुद्धा गुरुवारी एका दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. आदरपूर्वक नाव घ्यायचं झालं, तर सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत ते झालं आणि आज आम्ही उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करतोय. आता मराठीचा प्रश्न हा कोणी कुणाला विचारायचा ? असा प्रश्न आहे.
आम्ही सुद्धा सलीम-जावेद यांना आणू : तसंच ज्यांनी हा कार्यक्रम केला, त्यांनी त्यांची टिमकी सलीम-जावेदला बोलावून वाजून घेतली आहे. ते मोठे असतील, परंतु आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा 'नमोस्तव' दीपोत्सव झाला पाहिजे ही भाजपाची कल्पना आहे. हा मराठमोळा कोकणी वस्तीतील कार्यक्रम मराठी कलाकारांना घेऊन आहे. एखाद्या कार्यक्रमाला आम्ही सुद्धा सलीम-जावेद यांना आणू. परंतु कार्यक्रम वेगळा असेल, दीपोत्सवाचा नसेल, असा टोलाही त्यांनी यावेळी राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
शेलारांच्या टीकेला मनसेचं उत्तर : आशिष शेलारांनी केलेल्या टीकेवरुन आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्वीट करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शेलारांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
- https://x.com/SandeepDadarMNS/status/1723148184128811304?s=20
उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका : राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आशिष शेलारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे अन् त्यांच्या शिवसेनेवरही टीका केली. ते म्हणाले, तिसरे तर अजून घराबाहेरच पडले नाहीत. त्यामुळे बसलेले आहेत, की उभे आहेत ते सुद्धा लक्षात येत नाही. परंतु त्यांनी सुद्धा दिवाळीचे कार्यक्रम करावेत. त्यानिमित्तानं आपल्या सर्व कलाकारांना संधी सुद्धा मिळावी आणि आपणाला आनंद मिळावा.
हेही वाचा -