मुंबई -उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी तब्बल 1 लाख 25 हजाराहून अधिक मताने आघाडी घेत काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचा दारुण पराभव केला. या पराभवामागे काँग्रेसचा गड मानला गेलेल्या चांदिवली आणि कुर्ला परिसरात पूनम महाजन यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्याबरोबरर या मतदारसंघातूनच महाजन यांना आघाडी मिळाल्याने काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला आहे.
उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलीना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात कुर्ला हा राखीव मतदारसंघ असला तरी या मतदारसंघात पूनम महाजन यांनी बरीच मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे विलेपार्ले आणि चांदिवली या 2 मतदारसंघात 2 लाखाहून अधिक मते महाजन यांना मिळाली आहेत. तर त्या तुलनेत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना सव्वा लाखाचा आकडा पार करता आला नाही. या दोन्हीही मतदार संघात प्रिया दत्त यांनी जीवाचे रान करत प्रचार केला होता.
अभिनेते व भाऊ संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीही काढल्या होत्या, परंतु मतदारांनी त्यांच्या झोळीत भरभरून मते न देता पुनम महाजन यांना पसंती दिली. ज्या मतदारसंघात स्वतः प्रिया दत्त राहतात, त्या वांद्रे पश्चिम या मतदारसंघात थोडीशी आघाडी घेता आली असली तरी म्हणावे तितके यश त्यांना मिळू शकले नाही. यामागे त्यांच्या एकाकी लढ्याचीही कारणे दिसून येतात.
लोकसभा निवडणुकीच्या काहीच दिवस अगोदर त्यांना उमेदवारी देण्याचा विषय झाला होता. तरीही त्यांनी प्रचंड मेहनत घेत प्रचार केला. मात्र, काँग्रेसच्या कोणत्याही राष्ट्रीय आणि राज्यातील मोठ्या नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात सभा अथवा रॅलीत येऊन सहभाग घेतला नाही. प्रदेश काँग्रेससह मुंबईचे प्रदेशाध्यक्षही फिरकले नाहीत. त्या एकाकी लढा देत राहिल्या. त्याउलट भाजपच्या पुनम महाजन यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, यांच्यापासून भाजप-संघ कार्यकर्त्यांची आणि त्यासोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी प्रचारासाठी होती. यामुळेच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते अखेरच्या चोविसाव्या फेरीपर्यंत पूनम महाजन यांची आघाडी कायम राहिलेली दिसून आले.
या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर प्रभावी ठरेल, अशी चर्चा केली जात होती. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कुर्ल्यात एक भव्य सभाही झाली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या मतदारसंघात बरीच मते मिळविल, अशी अपेक्षा होती, परंतु या उमेदवाराला 33 हजाराहून अधिक मते घेता आली नाहीत. तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराने 4 हजाराच्या दरम्यान मते मिळवत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या विरोधातील रोष हा सर्वसामान्य मतदारांमध्ये व्यक्त केला जात होता. येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न, शौचालयाचे प्रश्न, यासोबतच स्वच्छतेपासून इतर अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती येथील स्थानिक मतदारांकडून देण्यात येत होती. त्यामुळे पूनम महाजन यांचा विजय निश्चित होईल याबद्दलचा मतदारांसोबतच भाजपच्याही काही नेत्यांमध्ये सांशकता व्यक्त केली जात होती. परंतु मतमोजणीच्या नंतर महाजन यांना मिळालेल्या यशाने मतदार आणि अनेक राजकीय तज्ञांचेही अंदाज खोटे ठरले.
या लोकसभा मतदारसंघात चांदिवली विधानसभा हे क्षेत्र काँग्रेसच्या ताब्यात आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसीम खान हे आमदार असून याच मतदारसंघात पूनम महाजन यांना 1 लाख 998 तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 73 हजार 743 मते मिळाली आहेत. त्यातुलनेत याच मतदारसंघात वंचितच्या अब्दुल रहमान अंजारिया यांनी 8 हजाराहून अधिक मते घेतली.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या मतदारसंघात काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रचंड तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर मिळाले आहेत. त्यातच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पुनम महाजन यांनी मुसंडी मारल्याने काँग्रेससाठी ती धोक्याची घंटा ठरणार आहे.