मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी समाजमाध्यमाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेची स्तुती केली. "शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करत आहे. हे सरकार 5 वर्षे टिकेल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील", असा विश्वाास त्यांनी व्यक्त केला.
पवारांच्या वक्तव्यावर राम कदमांची टीका
शरद पवारांच्या या वक्कव्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. "शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले. ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे. तसेच ही शरद पवारांची राजकीय अडचण आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकला नाही, तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे", असे राम कदमांनी म्हटले आहे.
शरद पवार नक्की काय म्हणाले?
'महाराष्ट्र शिवसेनेला अनेक वर्षे पाहतोय. देशात जनता पक्षाचे सरकार असताना त्यावेळी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सगळीकडे पराभव झाला होता. अशा स्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. त्या पक्षाने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला, हा इतिहास विसरता येणार नाही. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना', असे शिवसेनेचे कौतुक करताना पवारांनी म्हटले.
'राष्ट्रवादीची राजकीय हतबलता'
दरम्यान, राम कदमांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींंचे केलेले कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - संभाजीराजे, आंदोलनात चालढकल चालत नाही - चंद्रकांत पाटील